Tuesday 6 May 2014


                                     'विहंग'म सहल

एखादा क्षण असा येतो कि वाटतं आयुष्य इथेच थांबावं, जग इथेच संपावं, त्या क्षणापासून पुढे सरकूच नये, कारण एखादा अनुभव इतका सुंदर असतो कि तो गोठवून ठेवावासा वाटतो. माझी ही 'अशी' अवस्था झाली ती गेल्या महिन्यातल्या बारामती जवळच्या कुंभारगावातल्या पक्षी निरीक्षण सहलीत. 

कधी कधी असं होतं बघा, की आपण सहजच म्हणून एखादी गोष्ट करतो, फार गांभीर्याने वगैरे काही करत नाही, आणि अचानक या 'लेट्स ट्राय आउट' च्या सदराखाली मोडणाऱ्या काही गोष्टी अचानकपणे 'उम्मीद से दुगुना' असं काहीतरी देउन जातात. दोन दिवसांच्या कुंभारगाव सहलीच्या बाबतीत माझं तसंच काहीसं झालं. बोलता बोलता एकदा सौरभदादाने या ग्रूप टूरची माहिती दिली, हल्ली कुठे गेले नसल्याने मी पण बोर झाले होते, त्यात हे 'पक्षी निरीक्षण' काहीतरी वेगळं होतं. एका मैत्रिणीला सोबत घेतलं आणि सकाळी ६ वाजता ऐरोली ब्रिजकडे एकदाची बसमध्ये बसले. 

एकूण १८ जणांचा ग्रूप. सर्व अनोळखी होते, पण तेच दोन दिवसांचे 'सोबती' असणार होते! अनोळखी ग्रुपसोबत सहलीला जायची माझी पहिलीच वेळ. हळूहळू ओळख परेड झाली. काका, मावशी, ताई, दादा आणि काही नुसतेच मित्र-मैत्रीण म्हणण्यासारखे मेम्बर्स. डॉक्टर्स, रिटायर्ड मंडळी, कॉलेज स्टुडेंटस, कॉर्पोरेट- एमएनसीज असे वेगवेगळ्या क्षेत्रांतले हे लोक पक्षी बघायला जातात! मला भारीच वाटलं एकदम. म्हटलं चला, आपणसुद्धा बघूनच घेउ पक्षी :) 

दुपारी १ च्या सुमारास कुंभारगाव गाठलं. रखरखीत उन. गावातल्याच संदीप नगरे या स्थानिकाच्या घरी थांबलो. त्यांनी गेल्या गेल्या भाकरी, पिठलं, भाजी, ठेचा, कोशिंबीर अशा अस्सल वैदर्भीय जेवणासोबत ताकाने आमच्या पोटातली आग शांत केली. मग उन ओसरेपर्यंत टाईमपास करून चार वाजता मुख्य मिशन 'पक्षी निरीक्षणाला' उजनी जलाशयात बोटीतून निघालो. बोट साधी, छोटीशी. हळूहळू वल्हवत किनाऱ्यापासून दूर गेलो. संथ जलप्रवाह, त्यावर एका लयीत तरंगणारी आमची बोट, मागच्या किंचित तांबट कॅनव्हासवर अस्ताच्या तयारीला लागलेला सूर्य आणि शांतता अधिक गूढ करणारा तो वल्हवण्याचा आवाज! जादुईच वाटलं एकदम. 'ओ माजी रे' असं काहीतरी मनात येत होतं, पण फार फिल्मी झालं असतं ना… 

दूर बसलेला शुभ्र पक्ष्यांचा थवा नजरेच्या टप्प्यात आला. तेव्हा उगाचच एक्साईट वगैरे झाल्यासारखं वाटलं. आयला, मला कधीपासून पक्षी आवडायला लागले! 'असो' म्हणत मी पक्षी आणि बोटीतल्या माझ्या 'सोबत्यांच्या' हालचाली निरखत होते. बोटीत दोनजण कॅमेराधारी होते. पहिली दहा- पंधरा मिनिटं 'हे लोक काय त्या पक्ष्यांमध्ये इतकं आवडीने पाहतात' या विचारात पडले. एवढ्यात एक फ्लेमिंगो आमच्या अगदी डोक्यावरून, फार जवळून 'क्य क्य' आवाज करत उडत गेला. त्याचे पूर्ण पसरेलेल पंख, त्यावरील लाल रंग, त्याची ताठ-स्थिर मान कितीतरी वेळ पाहत बसले, तो ठीपक्याएवढा होईपर्यंत. काहीतरी वेगळं दिसत होतं, दिसणार होतं याची कल्पना आली. मग बोटीत बसून, मान शक्य तेवढ्या अंशात फिरवून असे असंख्य थवे डोळ्यांनी हेरण्याचा प्रयत्न केला.  कॅमेराधारींना ' ए इकडे बघ- तिकडे बघ' सांगून 'डायरेक्शन' द्यायलाही सुरुवात केली.  किनाऱ्यावरून निघताना मनात रुंजी घालणारे प्रश्न बहुधा किनाऱ्यावरच राहिले होते. पाहता पाहता मन खूप प्रसन्न झालं होतं, खूप शांत वाटत होतं.  


 
'दिल मांगे मोअर' म्हणत कॅमेराधारींनी गुडघाभर पाण्यात उदड्या मारल्या. दूर बसलेल्या थव्यांना टिपण्यासाठी ते काही अंतरावर गेले आणि सौरभदादाने एकदम टाळ्या वाजवल्या. धोक्याची सूचना लक्षात घेऊन ते जवजवळ हजारच्या घरात असलेले पक्षी थव्याथव्याने उडू लागले. एका क्षणात आसमंत असंख्य 'बगळ्यांच्या माळांनी' भरून गेला. त्यांची 'क्य क्य' अशी साद, पसरलेले पंख, आकर्षक रंग, डौल…  कुठे पाहू कुठे नको असं झालं. 'आनंद ओसंडून वाहणे' या वाक्प्रचाराचा प्रत्यय आला. सगळं मनात साठवून आम्ही बोट किनाऱ्याच्या दिशेने वळवली. पण 'पिक्चर अभी बाकी था मेरे दोस्त' कारण आम्ही निघतानाच बोटीतून मेलेले मासे आणले होते. ते थोडे थोडे पाण्यात भिरकवायला सुरुवात केली. सुरुवातीला कुणीच पक्षी आमच्या खाद्याला भाव देईना, पण मग एक-दोघा चाणाक्ष पक्ष्यांनी खाद्य हेरलं आणि ते पाण्याच्या पृष्ठभागावर झेपावून मासे टिपू लागले. त्यांना पाहून मग थवेच्या थवे आमच्या बोटीच्या दिशेने झेपावले. तो अनोखा नजारा नजरेत साठवायला कॅमेराच काय डोळेही अपुरे पडत होते. उडत येणारा पक्षी पंख फडफडवत पाण्यावर झेपावतो आणि ज्या हुशारीने नेमका पाण्यात सोडलेला मासा आपल्या चोचीने टिपतो ते पाहताना नकळतच निसर्गाच्या किमयेसमोर आपण नतमस्तक होतो. 

खाद्यजत्रा उरकली तोवर पाणी लाल-नीळ झाल होतं आणि कॅनव्हासवरचा गोळा गडद लाल झाला होता. मला तर आता किनाऱ्यावर परतूच नये असं वाटत होतं. तसं नावाड्याला सांगितलंही. त्यावर त्याने थोडा वेळ वल्हव बाजूला ठेवले आणि आमची बोट काही काळ एखाद्या ध्यानस्थ योग्याप्रमाणे लाल- निळ्या पाण्यावर निपचित तरंगत ठेवली. मला तर बोटीत मस्त हात-पाय पसरून अथांग आभाळाकडे नजर खिळवाविशी वाटत होती. पण सहप्रवाशांचा विचार केला आणि रसिकतेला जरा आवर घातला ;)  बसल्याच जागी एक समाधी लागली, निसर्गाचं सौंदर्य, त्याचं औदार्य, त्याची सगळीच मोहमयी रूपं मुरत गेली मनात, अगदी खोल…  आत. शब्द आटले आणि मूक संवाद सुरू झाला त्या आदी शक्तीशी.  खूप वेळ तंद्री लागली. मग लक्षात आलं कुणीच काहीच बोलत नव्हतं. वातावरणात असीम प्रसन्न शांतता भरून राहिली. शेवटी नावाड्यानेच वल्हव हातात घेतला आणि बोट किनार्याच्या दिशेने सरकू लागली. 



 दुसर्या दिवशी पहाटे हाच अनुभव आला. पण अर्थात तेव्हा कॅनव्हासवर सूर्योदयाच्या रंगच्छटा होत्या आणि उगवत्या सूर्याचं सुंदर रुपडं खुणावत होतं. पुन्हा तेच पक्षी, ती साद, ती मोहक हालचाल, खाद्यजत्रा, कॅमेराधारींची लगबग आणि परततानाची ती तंद्री. हा पण, परतताना तेवढंच नव्हतं. हातातून काहीतरी निसटत असल्याची एक तीव्र जाणीव होत होती. खूप काही निसटलंय आणि निसटत असतं आपल्या सर्वांच्याच हातून. 

नेमकं काय मिळतं अशा अनुभवांतून ते असं शब्दांत नाहीच सांगता येत. ते अनुभवायचं असतं, आत जिरवायचं असतं आणि कायम मनात जपायचं असतं. फार दूर नसलेलं, पण काहीसं आड वळणाचं कुंभारगाव, उजनी नदीचं पात्र, त्यावर आसमंतात गोंदलेला तो 'मित्र' आणि ज्यांच्याशी नव्यानेच मैत्री जुळली ते मुक्त- मनोहर विहंग… जियो यार जियो… तुम्हाला पाहायला मी पुन्हा येणार आणि पुन्हा पुन्हा येतच राहणार :)   
     
-अनुजा 
छायाचित्र : सौरभ महाडिक