Saturday 27 April 2013



वृद्ध नव्हे समृद्ध!

नमस्कार. सु/कुप्रसिद्ध (?) कुंभमेळ्यात आपलं कारटं हरवावं आणि मग अचानक एखाद्या दिवशी अचानक गवसावं तसं माझं या ब्लॉगच्या बाबतीत झालंय, तब्बलं दोन वर्षांनी पुन्हा एकदा ब्लॉग लिहितेय!

एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. आता डायरेक्ट मुद्द्यावर येते. दोन दिवसांपूर्वी मी घरी आईवडिलांना एक प्रश्न विचारला. तो असा, सिंगल आजोबा आणि सिंगल आजी एखाद्या वृद्धाश्रमात एकमेकांच्या प्रेमात पडले तर त्यांनी सहजीवन जगावं का? अर्थात या अनपेक्षित प्रश्नाने त्यांचा गोंधळ उडाला. उत्तर आलं, हो चालेल ना. त्यात काय? अचानक असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस वृद्धाश्रमावर आधारित एका पुस्तकाच्या कामाच्या निमित्ताने जोरात विचारमंथन सुरू आहे.
वृद्धाश्रमाचे काही फायदे आहेत तर काही तोटे. पण पार्टनर वारल्याने, लग्नच न केल्याने किंवा घटस्फोट झाल्याने एकटे असलेल्या वृद्धांसाठी (आजी/आजोबा) वृद्धाश्रम हा पर्याय आपल्या भाषेत सांगायचं तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखा असू शकतो, हा एक खूप मोठा फायदा आहे. या वयात एकट्या असलेल्या आजी/आजोबांभोवती मुलं, सुना, नातवंड यांचा मोठा गोतावळा असतो. समवयस्क मित्रांच्या/मैत्रीणींच्या भेटी-गाठीही होत असतात, पण तरी एकटेपणा पूर्णत: दूर होऊ शकत नाही. आयुष्यभर ज्याच्यासोबत जगलो त्या सहचार्याची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. शिवाय या वयात पुन्हा लग्न करण्याचाही कोणीच विचार करत नाही. पण म्हणून आजी/आजोबांनी उरलेलं आयुष्य एकट्याने कुढत जगणं मला पटत नाही. प्रत्येकालाच एका हळूवार मैत्रीची गरज असते. समलिंगी व्यक्ती कितीही चांगली मित्र/मैत्रीण असली तरी मनाचे काही कोपरे कायम रिकामीच राहतात जे केवळ भिन्नलिंगी व्यक्तीशी असलेली मैत्रीच भरून काढू शकते यावर माझा ठाम विश्वास आहे. या दृष्टीने आजीला एखादे आजोबा मित्र आणि आजोबांना एखादी आजी मैत्रीण म्हणून गवसायला हवी. पण आज किती वृद्ध अशा प्रकारची मैत्री खुल्या मनाने, ‘लोक काय म्हणतील’ चा बागुलबुवा दूर करून स्वीकारू शकतील? जरी त्यांनी स्वीकारली, तरी त्यांची मुलं असलेले आपले आई-वडील, आणि त्यांची नातवंड म्हणजे आपण हे स्वीकारू शकू?

मला खात्री आहे की, बरेच जण याला ‘म्हातारचळ’ म्हणून आजी-आजोबांना दूषणं देतील. कारण, आपल्या घरात राहात असलेल्या आजी-आजोबांना वर्षानुवर्ष समाजाच्या चौकटीत बांधून घ्यायची सवयच झालेली असते, आणि ते सुद्धा कायम स्वत:कडे ‘मुलं, नातवंड आपल्याकडे कसे पाहातील’ या चष्म्यातूनच पाहात असतात. पण किमान म्हातारवयातील एकटेपण आल्यावर तरी हा चष्मा त्यांनी उतरवायला हवा, त्यासाठी नवीन पिढीने त्यांना मदत केली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आयुष्यभर कुटुंबासाठी झटल्यावर आता काही काळ त्यांनी स्वत:साठी जगण्यात काय गैर आहे?

वृद्धाश्रमात हे सर्व अगदी सहज जुळून येतं आणि म्हणूनच एकट्या वृद्धासाठी घरापेक्षा वृद्धाश्रम हे अधिक उब देणारं ठिकाण आहे. इथे सगळेच वृद्ध एकत्र येतात, आपले विचार, सुख-दु:खं, जगणं आणि मरणंही शेअर करतात. या वयातही त्यांच्यात मैत्री फुलते आणि मुख्य म्हणजे ती अखेरच्या श्वासापर्यंत टिकते! अनेकदा काही उत्साही आजी-आजोबा सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय होतात कारण वृद्धाश्रमात आयताच ग्रूप तयार झालेला असतो. याच वातावरणात त्यांना आपल्याशी विचार जुळणारी, काळजी घेणारी आणि जिची काळजी घ्यावी अशी एखादी व्यक्ती भेटू शकते जी आधीच्या सहचारी/ सहचारिणीची जागा तर घेऊ शकत नाही पण किमान आयुष्यातील ते ‘विशेष’ स्थान नक्कीच काही प्रमाणात भरून काढू शकते. एकटेपणावर यापेक्षा चांगला उतारा असू शकतो?

‘पितृ देवो भव, मातृ देवो भव’ असे संस्कार झालेल्या आपल्या भारतीय संस्कृतीला वृद्धाश्रमाचा हा पर्याय सहजासहजी पचणारा नाही. पण हे झाले आपले दाखवायचे दात! सध्या बहुतेक घरांमध्ये असलेली वृद्धांची शारीरीक, मानसिक आणि मुख्य म्हणजे भावनिक स्थिती पाहता आता वृद्धाश्रम या पर्यायाकडे थोडं सकारात्मकतेने आणि तटस्थपणे पाहण्याची गरज आहे. समजा, वृद्धाश्रम हा पर्याय फार टोकाचा वाटत असेल तर आजी-आजोबांना घरच्या घरी ठेवून, आपल्या आणि त्यांच्या जीवनशैलीत, विचारांत काही छोटे बदल करूनही त्यांचं वृद्धत्व आनंदी करू शकतो.

माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत. त्यांचा नातू माझा चांगला मित्र. अनेक वर्ष अंथरुणाला खिळलेली त्याची आजी वारली, त्यामुळे आजोबा एकदम एकाकी झाले. काही दिवस नातेवाईकांचा गोतावळा सोबत होता, पण नंतर त्यांची चिडचिड वाढली. सतत आरडा-ओरड करायचे, कोणत्याही गोष्टीवर नकारात्मक प्रतिक्रियाच द्यायचे. माझ्या मित्राच्या लक्षात आलं की त्यांचा एकटेपणा हे यामागचं मूळ कारण असावं. आम्ही काही मित्र-मैत्रीणींनी मिळून यावर एक वेगळाच तोडगा काढला. त्याला सुचवलं की, आजोबांना एखाद्या बागेत घेऊन फिरायला जा. तिथे मुद्दाम त्यांच्या समवयस्कांशी ओळख करून दे. खास करून एखाद्या आजींशी. (अर्थात ही आजी सुद्धा अशीच एकाकी होती) त्याने हे सर्व मनावर घेऊन केलं आणि हळूहळू आजोबांच्या स्वभावात सकारात्मक बदल दिसू लागला. त्यांना भेटणार्या प्रत्येक माणसाला तो प्रकर्षाने जाणवू लागला. त्या आजींशी झालेली ओळख आजोबांच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडवणारी ठरली. दोघांचंही एकमेकांकडे येणं-जाणं सुरू झालं. दोन्ही कुटुंबं फार मोकळ्या मानसिकतेची असल्याने त्यांच्यावर टीका झाली नाही. उलट या वयात या दोघांचीही भावनिक गरज ओळखून या कुटुंबांनी दोघांची मैत्री अधिकाधिक फुलेल यासाठी प्रयत्न केले. आजही हे आजी-आजोबा मनातील आपल्या गत सहचार्याचे स्थान जोपासतानाच एका नवीन नात्याचा आनंद घेत आहेत.

आजी-आजोबा, आई-बाबा सगळे आपलेच, तेव्हा आपण सर्वांनी आपल्यासाठी जगावं, की समाजनियम सांभाळण्यासाठी हे ज्याचं त्याने ठरवावं.

-अनुजा